*कोपरी-पाचपाखाडीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निष्ठावंत शिवसैनिकाने दंड थोपटले.. शिवसेना ठाकरे गटाकडून प्रदीप शेंडगे इच्छुक*
ठाणे – शिवसेनेत उभी फूट पाडून मुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या ठाण्यातील कोपरी – पाचपाखाडी विधानसभेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निष्ठावंत शिवसैनिकाने दंड थोपटले आहेत.येत्या विधानसभा निवडणूकीसाठी कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे निवेदन कोपरीतील प्रदीप अभिमन्यु शेंडगे या उमद्या शिवसैनिकाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
शिवसेनेत फुट पाडुन मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दल निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तसेच मतदारांमध्ये आजही राग धुमसत आहे. त्याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आला. लोकसभेला मुख्यमंत्र्यांच्या कोपरी पांचपाखाडी विधानसभा मतदार संघात उबाठाचे उमेदवार मा. खासदार राजन विचारे यांनी तब्बल ६५ हजार मते मिळवली. त्याच कोपरीतील श्रमसाफल्य इमारतीत वास्तव्य असलेल्या प्रदीप शेंडगे या निष्ठावंत शिवसैनिकाने येत्या विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी दोन हात करण्याचा निर्धार केला आहे. प्रदीप शेंडगे हे गेल्या २० वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. या मतदार संघात उत्तम जनसंपर्क असलेले प्रदीप शेंडगे हे सामाजिक कार्य तसेच विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मदतीला धावत असतात. याच शिदोरीच्या बळावर त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे कोपरी – पाचपाखाडी मधुन लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.







