शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा फड रंगला
प्रचाराची नारळं फुटली; आपटबारही फुटू लागले

शेवगाव, पाथर्डी. (प्रतिनिधी) ८ नोव्हेंबर : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील, पाच राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार व अपक्षांसह एकूण सव्वा डझन उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाची नारळं अखेर तडतडली. यानिमित्ताने एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांचे आपटबारही फुटू लागले आहेत. खऱ्या आरोपांचे मोठे फटाके अजून बाकी असल्याचे सांगत सर्वच उमेदवारांनी आपापला प्रचार सुरू केला आहे.
महाविकास आघाडी : प्रताप बबनराव ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), महायुती : मोनिका राजीव राजळे (भाजप ), किसन जगन्नाथ चव्हाण : (वंचित बहुजन आघाडी), आत्माराम किसन कुंडकर (रासप), सुभाष त्रिंबक साबळे (बसपा), चंद्रशेखर मारुतराव घुले (अपक्ष), हर्षदा विद्याधर काकडे (अपक्ष), एकनाथ विष्णू सूसे (अपक्ष),
युनूस चांद शेख (अपक्ष), रत्नाकर जनार्दन जावळे (अपक्ष), राजेंद्र रंगनाथ ढाकणे (अपक्ष), शिवहार पुंजाराम काळे (अपक्ष), सलमान युसुफ बेग (अपक्ष),
संदीप गोरक्षनाथ शेलार (अपक्ष) व
सुधाकर रामभाऊ चोथे (अपक्ष) असे एकूण १५ उमेदवार या मतदारसंघात निवडणुकीस सामोरे जात आहेत. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह काही प्रमुख अपक्षांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे प्रचारास सुरुवात केली होती. आता चित्र स्पष्ट झाले असून प्रत्येक उमेदवार कामाला लागला आहे. पदाधिकारी व लाभार्थी कार्यकर्ते वगळता सर्वसामान्य मतदारांनी अजून तरी त्यांचा कल स्पष्ट केलेला नाही. त्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल हे लगेच सांगता येणार नाही.
भाजपाच्या उमेदवार तथा विद्यमान आमदार मोनिका राजळे, त्यांनी केलेल्या कामांच्या जोरावर मतं मागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार ॲड. प्रताप ढाकणे आरोपांना बगल देऊन महाराष्ट्र धर्माचा उल्लेख करत निर्वाणीची संधी मागत आहेत. माजी आमदार चंद्रशेखर घुले हे आमदार राजळे यांनी केलेली विकासकामे तकलादू असल्याचे सांगत पूर्वपुण्याईच्या बळावर मतं मागत आहेत. हर्षदा काकडे साखर सम्राटांच्या विरोधात मतं मागत आहेत तर किसन चव्हाण साखर व शिक्षण सम्राटांवर टीका करत मतं मागत आहेत. उर्वरीत उमेदवांराच्या जाहीर प्रचारसभा अजून सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा अजेंडा नेमका काय हे अजून स्पष्ट झाले नाही. प्रमुख उमेदवारांनी त्यांचा सारीपाट मांडला असला तरी मतदार अजूनही गप्प आहेत. राजकीय पक्षांच्या विचारधारांवरील विश्वास उडाल्याने, या मतदाससंघातील मतदार, या निवडणुकीत नेमका कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य देतो व कोणत्या डावपेचांना बळी पडतो-हे नजीकच्या भविष्यकाळात जसं जसं निदर्शनास येत जाईल तसं तसं या मतदासंघाचं चित्र स्पष्ट होत जाईल. तालुका प्रतिनिधी नरहरी शहाणे अँक्टिव्ह मराठी न्यूज पाथर्डी, शेवगाव.







