निर्भयाच्या धाडसाला स्नेहालयचे अभिवादन.
संपादक उमेश साठे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

निर्भयाच्या धाडसाला स्नेहालयचे अभिवादन.
(अक्टिव्ह मराठी)अहिल्यानगर, दिनांक 5 मार्च 2025.
पुणे येथे स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी बलात्कार झालेल्या मुलीने, *निर्भयाने* कायदेशीर कारवाई केली. आपल्यासारखेच इतर महिला आणि मुलींचे जीवन उध्वस्त होऊ नये म्हणून सराईत बलात्कारी गुन्हेगाराविरुद्ध संघर्ष करणाऱ्या *निर्भयाचे*
स्नेहालय परिवाराने अभिनंदन केले आहे.
वर्ष 2018 मध्ये स्नेहालय संस्थेच्या युवानिर्माण प्रकल्पाशी निर्भया जोडली गेली.
स्नेहालयाने आयोजित केलेल्या श्रमसंस्कार छावण्यांमध्ये आणि विविध सेवा कामात तिचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला.
बलात्कारानंतर या घटनेची माहिती तिने सर्वप्रथम युवानिर्माण प्रकल्पाच्या पुण्यातील आपल्या शिबिरार्थीं साथींना दिली.
या सर्वांनीच तिला अत्याचाराविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्यासाठी नैतिक आणि सक्रिय बळ दिले. घटना घडल्यापासून सर्व शिबिरार्थी एकत्रितपणे निर्भयाची पाठराखण करीत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक न्यायासाठी लढणारे वकील असीम सरोदे यांची निर्भयासह सर्व युवा कार्यकर्त्यांनी भेट घेतली. त्यांना कायदेशीर मदतीची विनंती केली.
बलात्काराच्या घटनेनंतर निर्भयाला पोलिसांचे काही सकारात्मक तर बरेचसे नकारात्मक अनुभव आले.
बलात्काराचे खटले न्यायालयात दीर्घकाळ चालतात, आपलीच बदनामी होते ,असे सांगून निर्भयाला नाउमेद करण्याचा प्रयत्न काहींनी केला.
निर्भयाचीच बदनामी आणि चारित्र्यहनन करण्याचे या काळात अनेक प्रयत्न झाले. आरोपीच्या वकिलांनी केलेले आरोप वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमातून प्रसिद्ध झाले . निर्भयाचे वडील काही वर्षांपूर्वी दिवंगत झाले. तिच्या आईवर मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल करू नये म्हणून दबाव आणण्याचे प्रयत्न झाले.
यासंदर्भात एड. सरोदे यांनी काल पुणे सत्र न्यायालयात भारतीय फौजदारी कायद्याच्या कलम 163 नुसार बळी निर्भयाच्या चारित्र्यहननाला प्रतिबंध करण्याबाबत तिच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. बळीच्या बदनामीला प्रतिबंध करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.
अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या निर्भयाची सातत्याने पाठराखण करण्याचे स्नेहालय परिवारातर्फे घोषित करण्यात आले. निर्भयाने धाडस केल्यानंतर महाराष्ट्राच्या अनेक भागातून बलात्काराच्या तक्रारी नोंदवण्याची हिंमत मुली आणि महिला करू लागल्या आहेत. सर्व अत्याचारीत महिलांचे त्यांच्या धाडसाबद्दल स्नेहालय परिवाराने अभिनंदन केले आहे.
या प्रश्नात कोणतेही मानधन न घेता कायदेशीर संघर्ष करणाऱ्या एडवोकेट सरोदे यांचे स्नेहालय परिवाराने अभिनंदन केले आहे…
एडवोकेट सरोदे यांची या सर्व घटनेवरील सविस्तर प्रतिक्रिया खालील लिंक वर ऐकता येईल.
महिला अत्याचाराच्या प्रकरणात मदत व मार्गदर्शनासाठी स्नेहालयची स्नेहाधार हेल्पलाइन अहोरात्र कार्यरत असते.9011363600 हा स्नेहाधार हेल्पलाइनचा संपर्क क्रमांक आहे. अहिल्यानगर आणि पुणे येथे संस्थेची अत्याचारीत महिलांसाठीची सुरक्षागृहे कार्यरत आहेत. संपादक उमेश साठे ॲक्टिव मराठी न्यूज. अहिल्यानगर







